‘डिजिटल अटक’ आणि ‘मनी लॉन्ड्रिंग’च्या नावाने होणाऱ्या सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार उरणमध्ये समोर आला आहे. बोरी नाका परिसरातील 68 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला टेलिकॉम कंपनी, सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी धमकावले. त्यांच्या भीतीचा फायदा घेत आरोपींनी 14 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान तब्बल 29 लाख 36 हजार 94 रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला एका महिलेने फोन करून मुंबईत त्यांच्या नावाने बनावट सिमकार्ड वापरले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या क्रमांकांवरून राजेश प्रधान नावाचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, राजेंद्र सिंग नावाचा सीबीआय अधिकारी आणि सुनीलकुमार गौतम नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधला. संदीप कुमार नावाच्या व्यक्तीच्या मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज स्मगलिंग आणि वुमन ट्रॅफिकिंग प्रकरणात त्यांच्या नावाने आयसीआयसीआय बँकेत 78 लाख रुपये जमा झाल्याचे सांगून अटकेची धमकी देण्यात आली.
या धमक्यांना घाबरून ज्येष्ठ नागरिकाने आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये लाखो रुपये जमा केले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी 17 ऑगस्ट रोजी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अशा फोन कॉलला घाबरून पैसे देऊ नयेत. सीबीआय, पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवर पैसे मागत नाही तसेच ‘डिजिटल अटक’ करत नाही. संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा 1930 सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.