माथेरान हे मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे ठिकाण कुटुंबासह निवास करण्यास स्वस्त असल्यामुळे याठिकाणी विशेषतः पावसाळ्यात मोठया प्रमाणावर वर्षासहलीसाठी पर्यटकांची गर्दी जुलै महिन्यापासून वाढतच आहे. त्यातच एकदिवसीय पर्यटकांची संख्या नव्वद टक्के असून निवासी पर्यटक सुध्दा नियमितपणे येत आहेत. परंतु स्वतःच्या खाजगी वाहनाने येणाऱ्या पर्यटकांना सुट्ट्यांच्या हंगामात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने घाटात अर्ध्यावर तासंतास अडकून राहावे लागते. त्यातच दस्तुरी नाक्यावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरवर्षी सुट्ट्यांच्या हंगामात उन्हाळ्यामध्ये आणि खासकरून पावसाळ्यात शनिवारी आणि रविवारी एन्जॉय साठी येणाऱ्या एकदिवसीय पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे माथेरान नकोसे वाटू लागले आहे. १५ ऑगस्ट या दिवशी तर नेरळ पासून पायी चालत येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. टॅक्सी सुध्दा मिळत नसल्याने नाईलाजाने टेंपो मधून माथेरान गाठावे लागले होते.या दोन दिवसांच्या हंगामात जवळपास पन्नास हजार पेक्षाही अधिक पर्यटक दाखल झाले होते. लहान लहान मुलांना घेऊन सुट्टी घालविण्यासाठी सर्वांनी माथेरानला पसंती दिली होती. जेमतेम पंधरा हजार पर्यटक जरी आले तरी माथेरान हाऊसफुल्ल होऊन जाते. परंतु पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक १५ ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. अशाप्रकारे ही वाहतूक कोंडी आणखीन किती वर्षे अशीच चालू राहणार आहे यात काही बदल घडवून येण्याची शक्यता आहे की नाही असा प्रश्न स्थानिक तसेच पर्यटकांमधून केला जात आहे. यावेळी हा पर्यटकांचा लोंढा पाहून असे वाटत होते की राज्यातील सर्व पर्यटनस्थळ बंद असून फक्त माथेरानच सुरू आहे की काय ?एवढी गर्दी न भूतो न भविष्यती अशीच पहावयास मिळाली.
प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या नाकर्तेपणामुळे याठिकाणी अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकलेली नाही ही खेदाची बाब असून पर्यटन मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे इथला विकास खुंटला आहे. राज्यातील मंत्र्यांना माथेरान हे पर्यटनस्थळ माहीत आहे की नाही असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.सर्व पर्यटन स्थळांवर ये जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध असताना केवळ माथेरानला पर्यायी मार्ग उपलब्ध होण्याची शक्यता असताना देखील हेतुपुरस्सर काही राजकीय मंडळी खोडा घालत असल्याचा अनुभव मागील काळात स्थानिकांना आलेला आहेच. पनवेल धोदाणी मार्गे फिनिक्युलर रेल्वे, चौक रामबाग पॉईंट मार्गे मोटार रस्ता उपलब्ध होऊ शकतो. फिनिक्युलर साठी मागील काळात सर्व्हे झाला होता. परंतु तालुक्यातील फार्म हाऊस ओस पडतील की काय या भीतीने काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खोडा घातला होता.
——————————————-
पावसाळ्यात जवळचे स्थळ माथेरान असल्याने आम्ही १५ ऑगस्टला शनिवारी सकाळी लवकरच आठ वाजता नेरळ स्टेशनवर आलो.त्यानंतर टॅक्सी साठी लांबच लांब रांगा पाहून अवाक झालो.कसेतरी घाटातून मार्ग काढत टॅक्सीने तब्बल चार तासानंतर दस्तुरीवर आलो तर तिथे सुध्दा ई रिक्षाच्या कमी संख्येमुळे आणखीन दोन तास प्रतीक्षा करावी लागली अखेरीस संध्याकाळी हॉटेलवर पोहोचलो. अर्धा दिवस याच सात किलोमीटर प्रवासात खर्च झाला ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे यात बदल करणे गरजेचे आहे.
-प्रणित देवकुळे–पर्यटक मुंबई
———————————————–
यावेळी प्रथमच एवढया प्रचंड गर्दीचा सामना आम्हाला करावा लागला. दस्तुरी नाक्यापर्यंत येण्यासाठी दोन तास लागले. नाईलाजाने आमची गाडी घाटात रस्त्याच्या कडेला पार्क करून सामान घेऊन पायपीट करावी लागली.सोबत आईबाबा वृद्ध असल्याने त्यांना थकवा जाणवला.असे दिवस आणि झालेला अनाठायी त्रास कायम स्मरणात राहील यात शंकाच नाही.