उरणमध्ये २६ वा राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचा थरार

उरणमध्ये २६ वा राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धेचा थरार
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली २५ वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त २६ वे राज्यस्तरीय वर्षा मॅरेथॉन व फुटबॉल स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १६ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामुळे उरणमध्ये क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे.
दरम्यान, अध्यक्ष महादेव घरत यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील शालेय तसेच खुल्या गटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. १४ ते १६ ऑगस्टदरम्यान उरण येथील वीर सावरकर मैदानावर (लाल मैदान) फुटबॉल स्पर्धा रंगणार असून, १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता बोकडविरा चारफाटा येथील एस.एम.एस.ई. ग्रेड मैदान, पेट्रोल पंपाजवळून ‘द्रोणागिरी महाराष्ट्र अभिमान दौड’ वर्षा मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता मॅरेथॉन स्थळी समारोप व पारितोषिक वितरण सोहळा होणार असून विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
गुणवंत खेळाडू, कलाकार आणि युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन गेल्या २५ वर्षांपासून विविध क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी उपाध्यक्ष मनोज पडते, खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे, महिला विभाग प्रमुख वैशाली घरत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, महिला विभाग, युवक कार्यकर्ते व सभासद परिश्रम घेत आहेत. राज्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.