रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्यानंतर पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे बुधवारी, दि. १९ ऑगस्ट रोजी प्रथमच माणगाव शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी शहरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असून, घोषणांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या दणदणाटात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
माणगाव शहराच्या प्रवेशद्वारावरील हॉटेल दत्तसाई येथे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते जमले होते. माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गोगावले यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी पालकमंत्र्यांसोबत सेल्फी घेत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी ज्ञानदेव पोवार यांनी भरतशेठ गोगावले यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत ही संपूर्ण रायगडसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. सामान्य कुटुंबातून राजकीय प्रवास सुरू करून चार वेळा आमदार, त्यानंतर मंत्री आणि आता रायगडच्या पालकमंत्रिपदापर्यंतची त्यांची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे पोवार म्हणाले.
दरम्यान, गोगावले यांनी दत्तसाई हॉटेलला काही मिनिटांची भेट देत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर त्यांच्या स्वागत मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. या उत्स्फूर्त स्वागतामुळे माणगावातील राजकीय वातावरणातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.