श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावाला पावसाळ्यात कोंढेपंचतन धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने ऐन पावसाळ्यातही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोंढेपंचतन गावाजवळ पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटल्याने सणाच्या दिवशीही गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पावसाळ्यात धरणात पाण्याची मुबलक उपलब्धता असतानाही जलवाहिनी फुटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. आगामी गौरी-गणपती सणांच्या काळातही अशीच परिस्थिती वारंवार निर्माण झाली तर गावासमोर मोठी पाण्याची टंचाई उभी राहण्याची शक्यता आहे. जलजीवन मिशनचं रखडलेलं काम, त्यातच कोंढेपंचतन गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम करताना ठेकेदाराकडून जलवाहिनीकडे झालेलं दुर्लक्ष आणि त्यामुळे ठिकठिकाणी झालेल्या तिच्या नुकसानीचा फटका बोर्लीपंचतनच्या पाणीपुरवठ्याला बसत आहे.
या निष्काळजीपणाची किंमत ग्रामस्थांना वारंवारच्या पाणी टंचाईच्या रूपाने मोजावी लागत आहे. पावसाळ्यानंतर कार्ले धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची सुद्धा हीच अवस्था असून बोर्लीपंचतन गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था भविष्यासाठी पुरेशी ठरणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत अधिकारी शंकर मयेकर हे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतू जुन्या व जीर्ण जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने दुरुस्तीची कामं करूनही काही दिवसांत पुन्हा तीच समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून नागरिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागत आहे.
वारंवार फुटणाऱ्या जीर्ण जलवाहिन्यांवर तात्पुरती दुरुस्ती करण्याऐवजी चांगल्या प्रतीच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याची गरज आहे. तसेच जलजीवन मिशनचं रखडलेलं काम लवकर पूर्ण करून गावासाठी पुरेशी पाणीपुरवठा व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. भविष्यातली पाण्याची वाढती गरज लक्षात घेता गावातील लोकप्रतिनिधी, पुढारी यांनी पक्षिय राजकारण बाजूला ठेवून ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना सोबत घेत या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे.
सणासुदीच्या काळात वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.