दहीहंडी म्हटली की उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्याचा थरार डोळ्यांसमोर येतो. मात्र, रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावातील दहीहंडीची परंपरा काहीशी वेगळीच आहे. ‘एक गाव, एक दहीहंडी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुर्डूसमध्ये गेल्या ३३ वर्षांपासून अनोख्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या खोल विहिरीवर तब्बल २५ फूट उंचीवर दहीहंडी बांधली जाते. ती फोडल्यानंतर गोविंदा थेट विहिरीतील पाण्यात पडतात आणि पोहण्याचा आनंद घेतात.
कुर्डूस गावातील ही विहीर तब्बल ४० फूट खोल आहे. या विहिरीच्या वर सुमारे २५ फूट उंचीवर दहीहंडी लटकवण्यात येते. हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके एकावर एक थर रचत उंच उडी मारण्याचा प्रयत्न करतात. हंडी फोडल्यानंतर गोविंदांचा थेट विहिरीत पडण्याचा क्षण पाहण्यासाठी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकतो. हंडी फोडण्याबरोबरच पाण्यात पोहण्याचा अनुभवही गोविंदांना मिळत असल्याने या दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरवर्षी कुर्डूसच्या या अनोख्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारो नागरिक आणि गोविंदा पथके दाखल होतात. यंदाही उत्सवाला मोठी गर्दी झाली आहे. विहिरीच्या चारही बाजूंनी नागरिकांनी रिंगण केले असून, महिलांचीही मोठी उपस्थिती दिसून येत आहे. गोविंदांच्या प्रत्येक प्रयत्नाला उपस्थितांकडून जल्लोषात दाद दिली जात आहे.
दरम्यान, रायगडमधील सुधागड तालुक्यातील जांबुलपाडा गावातील दहीहंडीची परंपराही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे गोविंदा पथके नाचत-खेळत दहीहंडीच्या ठिकाणी येतात. त्यानंतर अंगावर आसूडाचे फटके मारून घेत दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. या अनोख्या प्रथेमुळे जांबुलपाड्याची दहीहंडीही जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरते.
रायगडच्या ग्रामीण भागात दहीहंडी उत्सवाला केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचेही स्वरूप प्राप्त झाले आहे. कुर्डूसची विहिरीवरील दहीहंडी आणि जांबुलपाड्याची आसूडाची दहीहंडी या दोन्ही परंपरा रायगडच्या आगळ्यावेगळ्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवतात.