अंजुमन इस्लाम जंजिरा कॉलेजच्या कारभाराची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी; उत्तर न मिळाल्यास १५ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्धार

रायगड | अमूलकुमार जैन
महाविद्यालयाच्या इमारतीसाठी किती खर्च झाला? बांधकामाचा ठेका कोणाला मिळाला? शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून आलेला निधी नेमका किती? माजी विद्यार्थी संघटनेकडे किती देणग्या जमा झाल्या आणि त्यांचा विनियोग कसा झाला? अशा एकापाठोपाठ एक सात सवाल उपस्थित करीत अंजुमन इस्लाम जंजिरा दिघी कॉलेज ऑफ सायन्सच्या कारभाराचा हिशेब मागण्यात आला आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर थेट आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आल्याने मुरुड तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
साकीब मुश्ताक गजने यांनी २३ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना निवेदन देऊन महाविद्यालयातील प्रशासकीय, आर्थिक आणि शैक्षणिक बाबींची कागदपत्रांसह माहिती मागितली आहे. विशेष म्हणजे केवळ तोंडी स्पष्टीकरण नको, तर प्रत्येक मुद्द्याशी संबंधित अधिकृत आदेश, ठराव, पावत्या, आर्थिक नोंदी आणि नियुक्तीपत्रांच्या प्रती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामापासून या प्रश्नांची सुरुवात होते. बांधकामाची निविदा कोणत्या दैनिकात प्रसिद्ध झाली, किती ठेकेदारांनी सहभाग घेतला, निविदा कोणाला मंजूर झाली, ठेकेदाराला किती रक्कम देण्यात आली आणि प्रत्यक्ष कामाचा अंदाजपत्रकीय तपशील काय आहे, याचा संपूर्ण हिशेब मागण्यात आला आहे.
दुसरीकडे, अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणारे वेतन यामध्ये नेमका किती ताळमेळ आहे, याची पडताळणी करण्यासाठी वेतनाच्या नोंदी, बँक पासबुक आणि कॅशबुकच्या प्रती मागविण्यात आल्या आहेत.
प्रभारी प्राचार्यांची नियुक्ती, त्यांची शैक्षणिक पात्रता, मुदतवाढ, वेतनवाढ आणि कार्यकारिणीचे ठराव याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. याशिवाय अनुदानित व विनाअनुदानित कर्मचाऱ्यांची नियुक्ती, अपिलीय अधिकारी पदाची नियुक्ती आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या देणग्यांचा आर्थिक तपशील या मुद्द्यांचाही समावेश आहे.
या सर्व बाबींची माहिती १४ डिसेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा १५ डिसेंबरपासून महाविद्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालय प्रशासनावर राहील, असा इशारा गजने यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, कोकण विभागाचे संयुक्त संचालक, रायगड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
आता महाविद्यालय प्रशासन या सात प्रश्नांना कागदपत्रांसह उत्तरे देणार की उपोषणाची वेळ येणार, याकडे मुरुडमधील नागरिक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.