माथेरानच्या अलेक्झांडर पॉईंट परिसरात २१ वर्षीय तरुणाचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू !

कर्जत | गणेश पवार
माथेरान येथील प्रसिद्ध अलेक्झांडर पॉईंट परिसरात खोल दरीत पडून २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या घटनेने माथेरानमध्ये हळहळ व्यक्त होत असून, माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू जनकराम गौतम वय २१, रा. जुना भेंडीपाडा, अंबरनाथ, जि. ठाणे हा आपल्या मित्रासोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आला होता. अलेक्झांडर पॉईंट परिसरात असताना तो अचानक खोल दरीत पडला. घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस ठाण्याच्या सपोनि सरिता मुसळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दरीची खोली अधिक असल्याने तरुणाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
सह्याद्री रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दरीत शोधमोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर सुमारे १००० ते १५०० फूट खोल दरीत सोनू गौतम याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याची कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, या घटनेप्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ०२/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि सरिता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस करत आहेत.