नागरिकांनी विकासासाठी जमिनी दिल्या, प्रकल्पांना सहकार्य केले; मात्र सरकारी यंत्रणेतील फाईली पुढे सरकत नसतील तर विकासकामांना गती कशी मिळणार, असा सवाल उपस्थित करत खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रायगडमधील सागरी महामार्ग, विविध पुलांची रखडलेली कामे आणि रेल्वे स्थानकांच्या विकासाला आता ठोस कालमर्यादा देऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अलिबाग येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत तटकरे यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा मांडला. विकासकामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. टोकेखार ते तूरबाडी रस्त्यावरील पुलासाठी शासकीय जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव बराच काळ प्रलंबित असल्याने तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, तूरबाडी परिसरातील शेतकऱ्यांनी मोबदला निश्चित होण्यापूर्वीच प्रकल्पासाठी स्वेच्छेने जमिनीचा ताबा दिला आहे. नागरिक सहकार्य करत असताना प्रशासनाकडूनच प्रक्रिया रखडणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पुलाचे काम हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरू आहे.
दरम्यान, रेवस-करंजा, साळाव-दंडा आणि बाणकोट खाडीवरील बागमांडला या तीन महत्त्वाच्या पुलांच्या कामांनाही गती देण्याचे निर्देश देण्यात आले. हे पूल पूर्ण झाल्यानंतर रायगडच्या किनारपट्टी भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
४० वर्षांपूर्वीच्या आराखड्याला ‘अपडेट’ची गरज
रेवस-रेडी सागरी महामार्गाचे नियोजन सुमारे चार दशकांपूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर या मार्गालगत मोठ्या प्रमाणात वस्ती आणि बांधकामे झाली आहेत. त्यामुळे जुन्या आराखड्यानुसार काम करणे व्यवहार्य आहे का, याचा नव्याने अभ्यास करण्याची गरज तटकरे यांनी व्यक्त केली. एमएसआरडीसीने सद्यस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी अलाइनमेंट बदलावी किंवा विद्यमान मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली.
पेण रेल्वे स्थानकाला विमानतळासारखा लूक
पेण रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासालाही आता वेग मिळणार आहे. केंद्र सरकारने या स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली असून, विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून आराखडा अंतिम केला जाणार आहे. रोहा स्थानकाच्या निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन महिन्यांत पेण स्थानकाच्या कामाची निविदा काढण्याचे नियोजन असल्याचे तटकरे यांनी सांगितले. नागोठणे, गोरेगावसह अन्य रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामेही सुरू आहेत. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे या दोन्ही माध्यमांच्या पायाभूत सुविधांना एकाच वेळी गती देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.