महाडमध्ये पोटच्या पोराकडून आईवर सुरीने सपासप वार; प्रकृती चिंताजनक, आरोपी अटकेत

महाड | अमुलकुमार जैन
महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे पोटच्या मुलानेच आईवर भाजी कापण्याच्या सुरीने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विमल मोतीराम सुंभे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मुलगा राजेंद्र मोतीराम सुंभे (वय २४) याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी विमल सुंभे या आपल्या घरात भांडी घासत होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा राजेंद्र हा हातात भाजी कापण्याचा सुरा घेऊन तेथे आला. त्याने अचानक आईवर सुरीने हल्ला करण्यास सुरुवात केली. राजेंद्रने आईच्या शरीरावर सपासप वार केल्याने विमल या गंभीर जखमी झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
आईवर मुलाकडून हल्ला सुरू असल्याचे लक्षात येताच विमल यांचे पती मोतीराम सुंभे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राजेंद्रला बाजूला ओढून घेत आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी राजेंद्रने स्वतःवरही सुरीने किरकोळ वार करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, राजेंद्रने स्वतःच्या आईवर एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून हल्ल्यामागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विमल सुंभे यांना सुरुवातीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी आरोपी राजेंद्र सुंभे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.