पोलादपूरमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण

पोलादपूर | शैलेश पालकर
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गालगत निसर्गरम्य वातावरणात नव्याने उभारण्यात आलेल्या स्वराज कॉम्प्लेक्स येथे श्रीस्वामी समर्थ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा गुरुवारी भाविकांच्या हृदयस्पर्शी भक्तीभावाने पार पडला. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो खारजमीन विकास आणि फलोद्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते श्री स्वामी समर्थ मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मंत्री गोगावले यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अर्थ व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृऊबा समिती संचालक लक्ष्मण मोरे, विभागप्रमुख सतीश शिंदे, उद्योजक रामदास कळंबे, राजमुद्राचे उद्योजक सुनील मोरे तसेच अमी कन्स्ट्रक्शनचे प्रमुख मोदी आणि मॅनेजिंग डायरेक्टर संदीप पालकर आदींसह म्हाडा संलग्न स्वराज कॉम्प्लेक्सचे सदनिकाधारक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि पूजाविधी पार पडले. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, पोलादपूर शहरात भव्य स्वरूपात उभारण्यात आलेल्या स्वराज कॉम्प्लेक्सचे कौतुक करून प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वराज कॉम्प्लेक्समध्ये साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामुळे परिसराच्या वैभवात भर पडल्याने या माध्यमातून नागरिकांना आध्यात्मिक समाधान व भक्तीचा अनुभव मिळेल, असा विश्वास देखील व्यक्त केला.