रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथील शिक्षकाच्या बदली प्रकरणात बदल करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक तथा सहाय्यक लेखाधिकारी योगेश कुमार भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. २३) सायंकाळी रंगेहाथ ताब्यात घेतल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील समाधान हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजते.
भस्मे हे रायगड जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत असून, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहत असल्याची माहिती आहे. शिक्षक बदली प्रक्रियेत बदल करून देण्यासाठी तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम ‘वरिष्ठांसाठी कलेक्शन’ म्हणून घेतली जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे समजते.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने समाधान हॉटेलमध्ये भस्मे यांच्याकडे रक्कम सुपूर्द केली. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने भस्मे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर रायगड जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
या व्यवहारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, मागितलेली रक्कम नेमकी कोणासाठी होती आणि शिक्षकाच्या बदलीत कोणता बदल करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, याचा तपास एसीबीकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात, याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील आरोग्य सेवकाला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता जिल्हा परिषदेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या स्वीय सहाय्यकावरच लाच प्रकरणात कारवाई झाल्याने प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या कारवाईनंतर जिल्हा परिषदेत आता ‘पुढील सभेत नंबर कोणाचा?’ अशी चर्चा रंगू लागली आहे. एसीबीच्या तपासात या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात का, तसेच लाचेची रक्कम नेमकी कोणाच्या सांगण्यावरून मागण्यात आली होती का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अन्य कोणाचाही सहभाग अधिकृत तपासातून स्पष्ट झाल्यानंतरच त्याबाबत निष्कर्ष काढता येणार आहे.