महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबईने माणगावात आपल्या कार्याचा विस्तार करत शाखा व कोकण विभागीय कार्यालयाची दमदार सुरुवात केली. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी माणगाव येथे आयोजित करण्यात आलेला भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
माणगावसह संपूर्ण कोकण विभागातील सभासद, ठेवीदार व ग्राहकांना पतपेढीच्या विविध आर्थिक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, तसेच सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने शिवकृपा सहकारी पतपेढीच्या माणगाव शाखेसह कोकण विभागीय कार्यालयाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र तथा अध्यक्ष, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे प्रवीण यशवंत देरेकर उपस्थित होते, तर समारंभाध्यक्ष म्हणून गोरख तु. चव्हाण यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव चे प्रथम नागरिक शर्मिला शोभन सुर्वे, माजी राजीपा सदस्य राजीव अशोक साबळे, युवा क्रिकेट क्लब अध्यक्ष विक्रांत सतीश गांधी आणि ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष चिमणलाल पुरुषोत्तम मेथा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पतपेढीचे संस्थापक व उपाध्यक्ष, शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई चंद्रकांत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, कर्मचारीवर्ग, सभासद व प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या माणगावातील नव्या शाखेस तसेच कोकण विभागीय कार्यालयास शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात आदर्शवत कार्य करण्याच्या उद्देशाने पतपेढीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, माणगाव शाखेच्या माध्यमातून स्थानिक सभासद व ग्राहकांना अधिक जवळून सेवा उपलब्ध होणार आहेत. कोकण विभागीय कार्यालयामुळे या भागातील पतपेढीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गालगत खांदाड, माणगाव येथे सुरू झालेल्या या नव्या शाखेमुळे माणगाव व परिसरातील नागरिकांसाठी सहकार क्षेत्रातील आर्थिक सेवांचे नवे दालन खुले झाले आहे. शिवकृपा सहकारी पतपेढीची ही माणगावातील दमदार एन्ट्री भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, उद्घाटन सोहळ्याने नव्या कार्यपर्वाची उत्साहात सुरुवात झाली.