माथेरानच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नेरळ-माथेरान रेल्वे घाटमार्गाला बसला असून, वॉटर पाईप स्थानकाच्या वर एनएम-१३४, कड्यावरचा गणपती परिसरात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. माती, दगड आणि मलबा थेट रेल्वे रुळावर आल्याने मार्गाचा काही भाग झाकला गेला आहे.
मंगळवारी सकाळी कड्यावरचा गणपती मंदिराकडे गेलेल्या पर्यटकांच्या निदर्शनास ही घटना आली. डोंगरकड्याचा मोठा भाग खचल्याने मलबा रेल्वे मार्गावर आला असून, तो हटविण्यासोबतच संबंधित परिसराची सुरक्षितता तपासण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर उभे राहिले आहे. पावसाळ्यात या घाटमार्गावर दरड व दगड कोसळण्याचा धोका कायम असल्याने या घटनेने मार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सध्या पावसाळ्यामुळे नेरळ-माथेरान टॉय ट्रेन सेवा बंद असल्याने दरड कोसळली त्यावेळी मार्गावर प्रवासी रेल्वे नसल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, माथेरानला साहित्य पोहोचविणारी मालवाहतूक तसेच रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर टॉय ट्रेन सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असताना ही घटना घडल्याने मार्गाच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
टॉय ट्रेन सेवा सुरू करण्यापूर्वी रुळावरील मलबा पूर्णपणे हटविणे, रेल्वे मार्गाची तांत्रिक पाहणी करणे, दरड कोसळलेल्या डोंगरकड्याची स्थिती तपासणे तसेच घाटमार्गातील अन्य दरडप्रवण ठिकाणांची पाहणी करणे आवश्यक ठरणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा दरड किंवा दगड कोसळण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.