गणेशोत्सवात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
रायगड | अमुलकुमार जैन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच उत्सव काळात जिल्ह्यात अवैध मद्यविक्री आणि हातभट्टी दारूला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवली. १४ ते २० सप्टेंबर २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत जिल्हाभरात करण्यात आलेल्या कारवाईत ४५ गुन्हे दाखल करत २८ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत तब्बल ९ लाख ७ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा, सार्वजनिक मंडळांचे कार्यक्रम आणि विविध ठिकाणी होणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात विशेष लक्ष केंद्रित केले होते. हातभट्टी दारू निर्मितीची ठिकाणे, अवैध मद्यविक्री केंद्रे तसेच मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर पथकांकडून कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत ४२२ लिटर गावठी दारू आणि तब्बल १४ हजार ६०० लिटर रसायन जप्त करण्यात आले. याशिवाय ५९.५८ बल्क लिटर देशी मद्य आणि ६०.१८ बल्क लिटर विदेशी मद्यही जप्त करण्यात आले आहे. अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे एक वाहनही विभागाने ताब्यात घेतले.
गणेशोत्सव काळात अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी विभागाकडून विशेष पथकांच्या माध्यमातून तपासणी आणि कारवाई करण्यात आली. उत्सवाच्या काळात बेकायदेशीर मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक होऊ नये, यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रायगडमध्ये बनावट मद्य, शासनाचा कर किंवा उत्पादन शुल्क चुकवून होणारी मद्यविक्री तसेच हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक किंवा विक्री याबाबत नागरिकांकडे माहिती असल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८०० २३३ ९९९९ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात अवैध मद्यविक्रीला लगाम घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची मोहीम महत्त्वाची ठरली आहे.