अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देत असतानाच कोल्हापुरात २१ फूट उंच गणेशमूर्ती कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईसह विविध ठिकाणी गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्याने विसर्जन व आगमन मिरवणुकांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोल्हापुरातील वाय. पी. पोवार नगर मंडळाने यंदा २१ फूट उंचीची भव्य ‘बॅलन्सिंग’ गणेशमूर्ती साकारली होती. एका पायावर उभी आणि पुढील बाजूला झुकलेली ही मूर्ती ट्रॉलीतून विसर्जनासाठी नेण्यात येत होती. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गोखले कॉलेज चौकात मूर्ती नेली जात असताना तिचा विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानंतर मूर्ती अचानक कोसळली. या घटनेनंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी नियंत्रणात आणत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. दरम्यान, मूर्ती कोसळण्यामागे विसर्जन मार्गावरील विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्या असल्याचा आरोप गणेश मंडळाने केला आहे. मार्गातील अडथळे हटविण्याची विनंती करूनही त्याची पूर्तता झाली नसल्याचा मंडळाचा दावा आहे. मात्र महावितरणने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या मूर्ती कोसळण्याच्या घटनांची ही एकमेव घटना नाही. २२ ऑगस्ट रोजी मुंबईतील भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ची २२ फूट उंच मूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान कोसळली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते. त्यानंतर ८ सप्टेंबरला कुर्ल्यात ‘प्रेम नगरचा महाराजा’ची १५ फूट मूर्ती ट्रॉलीवरून नेत असताना कोसळली; या घटनेत तीन कार्यकर्ते जखमी झाले. तसेच १४ सप्टेंबरला मालाड पश्चिमेतील कांचपाडा परिसरात १७ फूट उंच गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कोसळली. त्यामुळे मोठ्या आणि उंच गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान विद्युत तारा, झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील खड्डे, स्पीडब्रेकर आणि वाहतूक व्यवस्थेची योग्य तपासणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.