तालुक्यातील लोहारे देऊळकोंड येथे स्वतःच्याच मुलाच्या छातीच्या भागात चाकू मारत खून करणारा आरोपी सचिन चिकणे याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने फिर्याद दिली असून पोलीस तपासात आरोपी सचिन विरोधात यापूर्वी 2020 सालामध्ये मुंबई शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे नोंद असल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान, मुलाच्या खुनप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात आरोपी सचिन बजरंग चिकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिन बजरंग चिकणे (वय ४३ वर्षे) आणि त्याची पत्नी फिर्यादी संध्या ह्या घर सामान खरेदी करण्यासाठी पोलादपुर येथे बाजारात आल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी या दूध आणण्यासाठी दुकानात गेल्या असता आरोपी पती सचिन चिकणे हा कोठेतरी निघुन गेला. त्यामुळे फिर्यादी व आरोपी यांची भेट झाली नाही. आरोपी सचिन चिकणे एकटाच देऊळकोंड येथील घरी पोहोचल्यानंतर पत्नी संध्या दिसून आली नाही. यानंतर काही वेळाने फिर्यादी संध्या सचिन चिकणे या घरी देऊळकोंड येथे गेल्या. घरी गेल्यावर आरोपी सचिन चिकणे याने याने पत्नी संध्या हिला ‘तुला बस डेपोत बोलावले होते, तु का आली नाहीस’ असे बोलुन शिवीगाळी करण्यास सुरुवात केली. यावेळी ‘तुमची सर्वांची अकड काढतो’ असे बोलुन सर्वांना शिव्या देत आरोपी सचिन चिकणे किचनमध्ये गेला. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा साई हा वडीलांना आईला का बोलताय, असे समजावण्यासाठी पुढे गेला असता आरोपी सचिन याने मुलगा साई याच्यासोबत झटापट केली. यावेळी आरोपी सचिन याने किचनमध्ये कांदा कापत असलेल्या सुरीने मुलगा साई याच्या छातीत डाव्या बाजुला सुरीने भोसकून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी साई जमिनीवर कोसळला तर आरोपी सचिन चिकणे याने महाडच्या दिशेने पळ काढला.
या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी आरोपीची पत्नी संध्या हिच्या फिर्यादी निहाय आरोपी सचिन विरोधात गुन्हा रजिस्टर नं. 101/2026 भा.न्या. स.2023 कलम चे 103 (1),352 ,भा. दं. वि. कलम 302, 504 निहाय गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी सचिन चिकणे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली असून मुंबई शिवाजी नगर पोलीस ठाण्यात येथे भा.दं.वि. १८६० कलम चे ३५४, ३५४(ड), ५०४, ५०९ गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई, पुणे व राज्यातील अन्य शहरांतील गुन्हा दाखल असलेल्या पोलादपूर तालुक्यात येऊन राहणाऱ्या आरोपींबद्दल यापुढे घरमालकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात माहिती देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.