ओएनजीसीच्या १७ कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय; खा. सुनील तटकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलनाची सांगता

उरण | विठ्ठल ममताबादे 
पनवेल तालुक्यातील न्हावा येथील ओएनजीसी कंपनीतील १७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ सुमारे ६०० कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाला अखेर यश आले. खासदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीनंतर ओएनजीसी प्रशासनाने १७ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याची तयारी दर्शविल्याची माहिती न्हावा ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष राजेश घरत यांनी दिली. बुधवारपासून (२३ सप्टेंबर) कामगारांनी पुन्हा काम सुरू केले.
न्हावा येथील ओएनजीसीच्या कामगार कपातीविरोधात सुमारे ६०० कामगारांनी बेमुदत संप सुरू केला होता. या आंदोलनाला न्हावा ग्रामस्थांनीही एकजुटीने पाठिंबा दिला, तर डॉक अँड वर्कर युनियनने आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, सोमवारी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी न्हावा येथे आंदोलनकर्त्या कामगारांशी संवाद साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या प्रश्नात तातडीने तोडगा काढण्यासाठी हालचालींना वेग आला.
दरम्यान, कामगारांच्या प्रश्नावर खासदार सुनील तटकरे यांनी ओएनजीसी प्रशासनाशी चर्चा करून मध्यस्थी केल्याचे सांगण्यात आले. स्थानिक भूमिपुत्र कामगारांचा प्रश्न असून आंदोलन अधिक तीव्र झाल्यास त्याचा परिणाम ओएनजीसीच्या कामकाजावर होऊ शकतो, अशी भूमिका प्रशासनासमोर मांडण्यात आल्याचे महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा १७ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत ओएनजीसी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे राजेश घरत यांनी सांगितले. यामुळे आठवडाभर सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला.
न्हावा ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कामगारांच्या प्रश्नासाठी एकत्रित भूमिका घेतल्याचे महेंद्रशेठ घरत यांनी सांगितले. डॉक अँड वर्कर युनियनचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे यांनीही आंदोलनात ठाम भूमिका घेतली. या लढ्याला खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य मिळाल्याचे राजेश घरत यांनी सांगितले. सरपंच विजेंद्र म्हात्रे, शैलेश पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, हनुमान भोईर तसेच न्हावा ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी यांनीही आंदोलन यशस्वी करण्यासाठी भूमिका बजावली.