पनवेल तालुक्यातील न्हावा येथील ओएनजीसी कंपनीत अनेक वर्षे कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात; परंतु १७ कंत्राटी कामगारांना कामावरून अचानक काढले आहे. त्यामुळे सुमारे ६०० कामगारांनी सहा दिवसांपासून बेमुदत संप पुकारला असून ठिय्या आंदोलन सुरू आहे. न्हावा ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २१) न्हावा येथे कामगारांशी संवाद साधला आणि कामगारांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “ओएनजीसीचे न्हावा येथील प्रशासन मुर्दाड आहे. कंत्राटी कामगारांना कायम करण्याऐवजी कामावरून काढून टाकणे, ठेकेदारांना पोसणे, याचा मी जाहीर निषेध करतो. प्रशासनाने ऐन गणेशोत्सवात कामगारांना रस्त्यावर यायला भाग पाडले आहे; परंतु विघ्नहर्ता गणेश कामगारांवरील हे संकट दूर करेल. कामगारांच्या पाठीशी मी सर्व शक्ती पणाला लावेन. न्हावा ग्रामस्थ राजकीय चपला बाजूला ठेवून एक झाले आहेत. आया-बहिणींचा खंबीर पाठिंबा आहे. त्यामुळे ओएनजीसी प्रशासनाला वठणीवर आणणारच. कारण न्हावा गावाने एकेकाळी अनेकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे आज येथील स्थानिक भूमिपुत्र कामगारांवरील अन्याय कधीही खपवून घेतला जाणार नाही.
ओएनजीसीच्या मग्रूर प्रशासनाने १७ स्थानिक कामगारांना तातडीने कामावर घ्यावे. अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल.” असे मत व्यक्त करत कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली.१७ कामगारांना व्यवस्थापनाने तातडीने कामावर घ्यावे आणि तसे लेखी पत्र कामगार संघटनेला द्यावे, अशीही कामगारांची मागणी आहे.