पारसिक हिलवरून कार थेट नेरूळ-बेलापूर-उरण मार्गिकेवरील रेल्वे रुळांवर कोसळली; १७ वर्षीय तरुण गंभीर  

रायगड | अमुलकुमार जैन
सीबीडी बेलापूर येथील पारसिक हिल टेकडीवरून एक कार थेट खाली रेल्वे रुळांवर कोसळल्याने गुरुवारी (२४ सप्टेंबर) दुपारी भीषण अपघात झाला. दुपारी सव्वातीन ते साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, कार चालविणारा १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पारसिक हिल बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या उंच टेकडीवरून ही कार थेट नेरूळ-बेलापूर-उरण मार्गिकेवरील रेल्वे रुळांवर पडली. कार रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर तातडीने परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा थांबविण्यात आली, तसेच हार्बर मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.
कार रुळांवर कोसळली त्यावेळी त्या ट्रॅकवरून कोणतीही लोकल जात नव्हती. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
रेल्वे प्रशासनाने अपघात निवारण ट्रेन (ART) घटनास्थळी पाठवून रुळांवर पडलेली कार हटविण्याचे काम हाती घेतले. त्याचबरोबर ओव्हरहेड विद्युत तार तसेच खांबांचे नुकसान झाले आहे का, याचीही तपासणी करण्यात येत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.