तालुक्यातील गोळेगणी गावातील सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल किशोर महादेव मोरे यांना त्यांच्या देशसेवेबद्दल चीफ ऑफ आर्मी स्टाफ अर्थात स्थलसेनाप्रमुख जनरल धीरज सेठ यांच्याहस्ते दिल्लीमध्ये ‘योद्धा सेवा सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तब्बल ३७ वर्षे देशसेवा करुन गावाकडे परतलेले लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे स्वतःच्या सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्त सैनिकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असतात.
लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे त्याचे वडील सुभेदार महादेव बाजीराव मोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात दाखल झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत एका सामान्य सैनिकापासून त्या लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पदोन्नती घेतली. ३७ वर्षांच्या सेवाकाळात किशोर मोरे यांनी जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, नागालँड सारख्या दूर्गम पर्वतीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावले. याकाळात पाकिस्तान तसेच चीनच्या सीमेवर तैनात असताना विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी झाले. सेवाकार्याच्या उत्तरार्धात गुवाहाटी, सिकंदराबाद, कोल्हापूर येथे एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्य केले. या काळात विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी सातत्याने संवाद साधत शिक्षण, शिस्त, नेतृत्वगुण आणि चारित्र्य निर्मिती याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे त्यांनी कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी समाजसेवा, राष्ट्र निर्माणाची आपली बांधिलकी कायम ठेवली. मोरे यांनी आजमितीस २६ तरुणांना सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी यशस्वी मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी या मूळगावी ते सध्या स्थायिक झाले आहेत.
सुमारे दोन वर्ष वरिष्ठ मुख्यालयाशी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून महाड येथे युआरसी इएसएम स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचमुळे महाड पोलादपूर यासह रायगड जिल्ह्यातील इतर दुर्गम भागातील माजी सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना आवश्यक त्या सीएसडी कॅन्टीन सुविधा उपलब्ध झाल्या. रायगड जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या आर्मी सीएसडी कॅन्टीन महाडमध्ये सुरू करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सध्या ते महाड तथा चिपळूण आर्मी सीएसडी कॅन्टीनचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून माजी सैनिक त्यांच्या कुटुंबियांच्या पेन्शन तसेच सैनिकांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. सेवानिवृत्तीनंतर लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे यांनी महाविद्यालयीन व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान तसेच सैन्य दलात भरती संदर्भात तरुणांना मार्गदर्शनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे.
सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे यांना ‘योद्धा सेवा सन्मान’ नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून महाड पोलादपूर परिसरातील विविध शाळा महाविद्यालय तसेच आपत्ती निवारण कार्यात शासन व शासनासोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी सैन्यदलातील अनुभवाचा लाभ घेण्याचे आवाहन लेफ्टनंट कर्नल मोरे यांनी केले आहे.