पनवेल आरटीओतील कथित दलालीविरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा पवित्रा

पनवेल | प्रतिनिधी
पनवेल येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात ‘एडीसी’च्या नावाखाली कथितपणे सुरू असलेली अनधिकृत दलाली, नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक गैरव्यवहार याविरोधात १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता खारघर सेक्टर-३६ येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहबाज फारुक पटेल यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणी प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी, निवेदने तसेच स्मरणपत्रे सादर करूनही अद्याप ठोस कारवाई अथवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून आरटीओ कार्यालयातील कारभार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि दलालमुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एडीसी’च्या नावाखाली सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित अनधिकृत दलालीची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
आरटीओ कार्यालयातील सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने व्हावे, सर्व कक्षांमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नागरिकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत. हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.