जिल्ह्याच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संततधार पाऊस सुरू असतानाही नळाला पाणी येत नसल्याने संतप्त महिला व पुरुष ग्रामस्थांनी भर पावसात हातात रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायतीवर ‘हंडा मोर्चा’ काढला. शेकाप नेते दत्ता ढवळे आणि ॲड. परेश देशमुख यांच्या उपस्थितीत पिंपळभाट येथून निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले. वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि मोठ्या प्रमाणातील बांधकामांमुळे पाण्याची मागणी वाढली असताना पाणीपुरवठा व्यवस्था मात्र अपुरी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीकडून दरवर्षी जवळपास पावणेदोन कोटी ते दोन कोटी रुपयांच्या दरम्यान पाणीपट्टी वसूल केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत असताना नियमित पाणीपुरवठा का होत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर पोहोचला असता प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर आणि ग्रामविकास अधिकारी निलेश गावंड उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. अधिकाऱ्यांच्या खुर्च्या खाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तो निर्णय थांबविण्यात आला. त्यानंतर प्रशासकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता त्यांनी लवकरात लवकर पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, चेंढरे हद्दीत सात-सात मजली इमारती उभ्या राहत असताना त्यासाठी आवश्यक पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. ‘पाण्याची व्यवस्था अपुरी असताना मोठ्या इमारतींना बांधकाम परवानगी कशी दिली जाते?’ असा थेट प्रश्न प्रशासनाला विचारत ग्रामस्थांनी पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी बी. एस. पाटील, दत्ता ढवळे, संदीप ढवळे, अविनाश राणे, प्रिया ढवळे, नागेश्वरी हेमाडे, सायली तांबे, नम्रता शिर्के यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.