रायगडमधील ओबीसी थकबाकीदारांसाठी दिलासादायक योजना; एकरकमी कर्जफेडीवर ५० टक्के व्याजसवलत

रायगड | अमुलकुमार जैन 

रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाने एकरकमी परतावा (OTS) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जरक्कम एकरकमी भरल्यास थकीत व्याजाच्या ५० टक्के रकमेवर सवलत मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाची उपकंपनी असलेल्या शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध कर्ज योजनेंतर्गत अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात आले आहे. या कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांसाठी आता एकरकमी परतावा (OTS) योजना राबविण्यात येत आहे.
ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत थकीत कर्जाची संपूर्ण रक्कम एकरकमी भरून कर्ज खाते नियमित करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली कर्जाची थकबाकी पूर्णपणे फेडून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे.