सिगारेटच्या पैशांवरून झालेल्या वादातून धारदार हत्याराने गळा कापून एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील दोषी मयुरेश ऊर्फ लक्ष्या गोपीचंद पड्याळ (वय २९, रा. लाडवली, ता. महाड, जि. रायगड) यास महाड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ₹५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या या निकालामुळे महाड शहर पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात महाड शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १७/२०२०, भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी नूर हमजा भाटकर (वय २७, रा. दासगाव, ता. महाड, जि. रायगड) असून, तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. डी. सणस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. योगेश तेंडुलकर यांनी बाजू मांडली.
१४ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास सिगारेटच्या पैशांवरून झालेल्या वादातून आरोपी मयुरेश ऊर्फ लक्ष्या पड्याळ याने दिलीप दगडू सावळी (वय ५५, रा. कुंवळा, जुई-महाड, जि. रायगड) यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून गळा कापत त्यांना जिवे ठार मारल्याचे गुन्ह्याच्या हकिकतीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सुनावणी महाड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे मयुरेश ऊर्फ लक्ष्या गोपीचंद पड्याळ यास दोषी ठरवत भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप तसेच ₹५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पुढील शिक्षेची तरतूदही निकालात करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर खटला न्यायालयात प्रलंबित असताना सरकारी अभियोक्ता ॲड. योगेश तेंडुलकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त होताच ती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याची तजवीज करण्यात आली असल्याचे महाड शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने महाड शहर पोलिसांच्या तपासाची महत्त्वपूर्ण दखल न्यायालयीन निकालातून घेण्यात आली आहे.