उल्हास नदीची पाणीपातळी घटली; भोई समाजाच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर संकट

The water level of the Ulhas River has dropped
कर्जत | गणेश पवार
कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीची पाणीपातळी घटल्याने आता भोई समाजाच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी योग्य प्रकारे बसविल्या न गेल्यामुळे पाणी वाहून गेल्याचा दावा अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाने केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
कर्जत तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानंतर काही काळ उल्हास नदी तुडुंब भरून वाहत होती. मात्र, गणपती विसर्जनाच्या काळात बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटी योग्य प्रकारे न बसवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आणि नदीची पाणीपातळी झपाट्याने घटल्याचा दावा भोई समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
उल्हास नदीवर अवलंबून असलेल्या कर्जत शहरातील सुमारे १५० ते २०० भोई समाजाच्या कुटुंबांच्या मासेमारी व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. पाणीपातळी आणखी घटल्यास बोअरवेल आणि नैसर्गिक विहिरींच्या पाणीपातळीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 
नदीपात्रात टप्प्याटप्प्याने तीन ते चार फूट उंचीचे काँक्रीट बंधारे उभारून पाणी अडवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. बंधाऱ्याच्या प्लेटी तातडीने दुरुस्त करून पाणीपातळी राखावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भोई समाजाचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल गोविंद पवार यांनी दिला आहे. आता उल्हास नदीतील पाणीपातळी आणि बंधाऱ्याच्या प्लेटींच्या स्थितीबाबत प्रशासन कोणती उपाययोजना करते, याकडे भोई समाजाचे लक्ष लागले आहे.