लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) शिवाजी चौक येथे निषेध सत्याग्रह करण्यात आला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पुकारलेल्या ‘लोकशाहीसाठी काळा दिवस’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये हा निषेध सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानाचे रक्षण आणि निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वासाठी काँग्रेसचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. निवडणूक व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी पारदर्शकता आणि निष्पक्षता आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. या आंदोलनातून काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधातील आपला निषेध नोंदवला.