पोलादपूर तहसील कार्यालयातर्फे शेतीचे सर्व्हेक्षण प्रगतीपथावर; प्रांताधिकारी ओमासे व तहसीलदार घोरपडे यांनी केली पाहणी 

पोलादपूर | शैलेश पालकर 
तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सरकारी लाभ मिळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने पोलादपूर तहसील कार्यालयातर्फे गेल्या काही दिवसांपासून लागवडीखालील शेतजमिनींचे सर्व्हेक्षण युध्दपातळीवर सुरू आहे.
या सर्व्हेक्षणाच्या कामाची पाहणी महाडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी पोपट ओमासे आणि पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केली. पोलादपूर तहसील कार्यालयांतर्गत एकूण ८२ हजार ८८४ शेतजमिनीचे सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सर्व १५ ग्राम महसूल अधिकाऱ्यांसोबत १५७ सर्व्हेक्षण सहायकांच्या मदतीने २५ हजार २८७ शेतजमिनींचे आणि दुसऱ्या दिवशी २७ हजार ४९८ शेतजमिनींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. 
येत्या दोन दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन पोलादपूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची निश्चिती झाल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारला सविस्तर अहवाल सादर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.