दिल्लीतील २२ वर्षीय नातेवाईक तरुणीवर मुंबईत तब्बल सात वर्षे लैंगिक अत्याचार व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक एक व दोन अशी नोंद असलेले दोघेही तपास सुरू होताच फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
पीडिता दिल्लीतील नजफगढ येथे राहत होती. २०१८ साली ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना आरोपी नातेवाईकाने तिला शिक्षणाच्या बहाण्याने मुंबईत आणले. त्यानंतर गावी आणि मुंबईत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडितेने ही बाब एका ओळखीच्या व्यक्तीला सांगितल्यानंतरही आरोपींनी तिला धमकावून अत्याचार सुरूच ठेवले आणि मानसिक दबावाखाली ठेवले. हा छळ २०१८ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुरू होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
पीडितेने प्रथम दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण वर्ग करून भोईवाडा पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आले. गुन्हा नोंद होताच आरोपी फरार झाले असून त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे.