कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील झुगरेवाडी जिल्हा परिषद शाळेला विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करून देणारे उपक्रमशील मुख्याध्यापक रवी काजळे यांच्या उल्लेखनीय कार्याची शिक्षक दिनानिमित्त दखल घेण्यात आली. मुंबईतील असल्फा येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘शिक्षक सन्मान हंडी सोहळ्यात त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
किरणभाऊ लांडगे मित्रमंडळ, असल्फा यांच्या वतीने आयोजित या आगळ्यावेगळ्या सन्मान सोहळ्याला राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते रवी काजळे यांचा सन्मान करण्यात आला.
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रवी काजळे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आर्थिकदृष्ट्या अडचणीतील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी स्वखर्चातून उच्च शिक्षणासाठी मदत केल्याचेही सांगण्यात आले. त्यांच्या या कार्याची राजधानी मुंबईत दखल घेत सन्मान झाल्याने झुगरेवाडी शाळेचे नाव महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत पोहोचले असून, कर्जत तालुक्यासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे. या सन्मानाबद्दल रवी काजळे यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
———————————-
सन्मानामुळे विद्यार्थीहिताचे काम करण्यास नवी ऊर्जा.. आज शिक्षक दिनी किरणभाऊ लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्ञानदेव हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महापौर सन्माननीय रितू तावडे यांच्या हस्ते राजधानी मुंबईत झालेला सन्मान आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या सन्मानामुळे कार्य करण्यासाठी नवी प्रेरणा व ऊर्जा मिळाली असून, यापुढेही विद्यार्थीहितासाठी अधिक जोमाने काम सुरू ठेवू.