पनवेल शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान १,३२० कारवाया करून ९ लाख ५० हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रिक्षाचालकांकडून होणाऱ्या नियमभंगाला आळा घालण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ११.३० या वेळेत वाहतूक शाखा व आरटीओची संयुक्त कारवाई करण्यात आली. नवीन पनवेल रेल्वे स्टेशन, एचडीएफसी, आदई सर्कल आणि माथेरान रोड परिसरात झालेल्या या मोहिमेत रिक्षामध्ये अनधिकृत फ्रंट सीट बसवणे, गणवेश न परिधान करणे, मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, काळ्या काचा, विना हेल्मेट वाहन चालविणे यांसह विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली. आरटीओकडूनही ४२ कारवाया करून ३ लाख ८४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल गेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करून मीटरप्रमाणे भाडे आकारावे व प्रवाशांशी नम्रपणे वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, सिग्नलचे उल्लंघन करू नये आणि चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, असे वाहतूक शाखेने सांगितले आहे.