गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय, अवाजवी भाडे आकारणी, लूटमार तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात रिक्षा व प्रवासी बस चालकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रिक्षांची कागदपत्रे वैध ठेवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न वाहणे आणि निश्चित दरापेक्षा जादा भाडे न आकारणे बंधनकारक आहे. बसमधील आपत्कालीन खिडकी, दरवाजा, अग्निशामक यंत्रणा व प्रथमोपचार पेटी सुस्थितीत ठेवण्यासह चालकांनी मद्यपान करून किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, गैरवर्तन करणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा मार्ग आणि तक्रारीचा तपशील नमूद करून rto.46-mh@gov.in या अधिकृत ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चाकरमानी भाविकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलकडून सांगण्यात आले आहे.