मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. नव्या भाडेदरानुसार भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेण्यासाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ अशी मुदत देण्यात आली आहे. पेण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अलिबाग व पेण तालुक्यांतील सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सीधारकांनी विहित मुदतीत मीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विहित मुदतीत रिकॅलिब्रेशन न केल्यास १ डिसेंबर २०२६ पासून प्रत्येक दिवसाला ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यात येणार असून, हे शुल्क कमाल ५ हजार रुपयांपर्यंत राहणार आहे. तसेच मीटर रिकॅलिब्रेशन संस्था आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी त्यांच्या निर्धारित कार्यक्षेत्राबाहेरील वाहनांचे प्रमाणपत्र देऊ अथवा स्वीकारू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मीटर सील करण्यासाठीही नियम निश्चित करण्यात आले आहेत. ऑटोरिक्षाच्या मीटरसाठी एक, आवश्यकता असल्यास दोन रेटो सील, तर टॅक्सी मीटरसाठी दोन रेटो सील वापरणे बंधनकारक राहणार आहे. मीटरमध्ये बसविलेल्या सीलचे क्रमांक संगणकीय बीजकावर नमूद करणे आवश्यक असून, हस्तलिखित बीजकाचा वापर करता येणार नाही.
मीटर सेवांसाठी ७०० रुपये निश्चित शुल्क
मीटर उत्पादक, दुरुस्ती, तपासणी आणि सीलिंगसाठी जीएसटीसह समान शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मीटर उत्पादकासाठी २८० रुपये, मीटर दुरुस्तीसाठी २७५ रुपये, मीटर तपासणीसाठी १२० रुपये आणि मीटर सीलसाठी २५ रुपये, असे एकूण ७०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
मीटर उत्पादक, रिकॅलिब्रेशन संस्था तसेच मीटर दुरुस्ती करणाऱ्यांनी निर्धारित शुल्काचा फलक आस्थापनेच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सीधारकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपल्या वाहनाच्या भाडेमीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेऊन, प्रवाशांकडून नव्या भाडेदरानुसार योग्य भाडे आकारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.