मंगला एक्सप्रेसमध्ये १५ दिवसांच्या बाळाचा मृत्यू! तापामुळे प्रकृती खालावली; वीर स्थानकात ट्रेन थांबवून दासगाव आरोग्य केंद्रात नेले, डॉक्टरांनी मृत घोषित केले

मंगला एक्सप्रेसमध्ये १५ दिवसांच्या बाळाचा मृत्यू
रायगड | अमुलकुमार जैन
छत्तीसगडहून कन्नूरकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये अवघ्या १५ दिवसांच्या बाळाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकाजवळ घडली. तापामुळे बाळाची प्रकृती खालावली होती. वीर स्थानकात ट्रेन थांबवून बाळाला दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लारखा हे त्यांच्या पत्नी, दोन वर्षांची मुलगी आयफा आणि १५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या मोहम्मद हसन या बाळासह छत्तीसगडहून कन्नूरकडे मंगला एक्सप्रेसने प्रवास करत होते. २ सप्टेंबर रोजी त्यांनी छत्तीसगडहून कन्नूरला जाण्यासाठी प्रवास सुरू केला होता. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर मोहम्मद हसन याला ताप आला. भुसावळ रेल्वे स्थानकावर बाळावर उपचारही करण्यात आले होते. 
मात्र, प्रवासादरम्यान महाड तालुक्यातील वीर स्थानकाजवळ बाळाची हालचाल बंद झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आली. सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास मंगला एक्सप्रेस वीर स्थानकात थांबविण्यात आली. रेल्वे प्रशासनाने बाळाला तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले.
आरोग्य केंद्रातील डॉक्टर अजिंक्य जाधव यांनी तपासणी केल्यानंतर बाळाला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अल्लारखा हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून सध्या कन्नूर येथे मोटारसायकल मेकॅनिक म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नीचे माहेर छत्तीसगड येथे असून, मोहम्मद हसनचा जन्म तेथेच झाला होता. बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानंतर रेल्वे पोलीस आर. एम. चव्हाण आणि होमगार्ड सिद्धांत मोरे यांच्या माध्यमातून बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.