पोलिसांची तत्परता; १० वर्षीय साहिद खान पालकांच्या स्वाधीन

पनवेल | प्रतिनिधी 
पनवेल पोलीस ठाणे हद्दीत एकटा आढळून आलेल्या १० वर्षीय मुलाचा पोलिसांनी तत्परतेने शोध घेत त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिंतेत असलेल्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
साहिद खान (वय १०, रा. कळवा नाका, ठाणे) हा मुलगा पनवेल पोलीस ठाणे हद्दीत एकटा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या पालकांचा शोध सुरू केला. प्रयत्नांनंतर पालकांशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.
पालक पोलीस ठाण्यात आल्यानंतर आवश्यक खात्री करून साहिद खान याला सुखरूपपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या या तत्पर, संवेदनशील आणि सतर्क कारवाईबद्दल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची दक्षता या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली.