रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित गौरी गणपती आरास स्पर्धेत वखारदार परिवार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून सलग चार वर्षे प्रथम क्रमांक येत असल्याने वखारदार परिवाराचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
रोहा पंचायत समिती कार्यालया जवळ भुवनेश्वर येथे राहणारे कृष्णा महादेव वखारदार यांच्या निवासस्थानी सालाबाद प्रमाणे यंदाही गणपती विराजमान झाले होते.संजय वखारदार, संदिप वखारदार यांच्या कुटुंबीयांनी यंदाही सुंदर मनमोहक काशी मधील वाराणसी घाट हे प्रेरणादायी धार्मिक संदेश निर्माण करणारी आरस सजावट केली होती. एक महिन्याच्या अथक प्रयत्नाने अत्यंत प्रभावशाली घरा मधील कमित कमी जागेत कल्पकतेने सजावट केली. गेल्या वर्षी वखारदार कुटुंबियांनी तयार केलेले पुरातन काळातील मंदिर चलचित्र देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
सन २०२३/२४ मध्ये शिर्डी मधील द्वारकामाई तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुलस्वामिनी आई तुळजा भवानी माता,महालक्ष्मी, आई एकवीरा देवीचे मनमोहक रूप साकारले होते. यावर्षी काशी मधील प्रसिद्ध वाराणसी घाट दाखवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला असून सलग चार वर्षे प्रथम क्रमांकाचे बक्षीस वखारदार परिवाराने मिळवले आहे. गणपती उत्सवादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजकांनी स्पर्धेच्या नियमानुसार परीक्षण करून वखारदार परिवाराच्या गणेशोत्सवातील वाराणसी घाट देखाव्याला प्रथम क्रमांक दिला. त्यांच्या निवासस्थानी जाऊन रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरण करून परीवाराला सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक अजित मोरे,स्वप्नील धनावडे,प्रेषित बारटक्के, नितीन कोलटकर व मान्यवर उपस्थित होते.