तक्रारींच्या गुंत्यात अडकलेला वाद PI आंधळेंनी सोडवला; रुद्रवलीतील गाव बैठकीत गैरसमज दूर, नागरिकांकडून कौतुक

माणगांव | नरेश पाटील 
रुद्रवली गावातील एका महिलेने काही व्यक्तींकडून सातत्याने होत असलेल्या कथित त्रासाबाबत वारंवार लेखी तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडेही तक्रारींच्या प्रती पाठविल्यानंतर माणगाव पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रुद्रवली येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात तक्रारदार महिला, तिचे कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांच्या उपस्थितीत खुली चर्चा घेण्यात आली. यावेळी PI मारुती आंधळे, PSI जाधव, API, पोलीस कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. चर्चेला सुरुवात होताच PI आंधळे यांनी दोन्ही बाजू अत्यंत संयमाने ऐकून घेत संपूर्ण प्रकरण समजून घेण्याची भूमिका घेतली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर संबंधित महिला आणि गावातील एका व्यक्तीमध्ये जमिनीच्या वादातून काही गैरसमज निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी महिलेने सर्वांसमक्ष हातात नारळ घेऊन तो फेकून दिल्याचे सांगत त्याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडला होता. दुसरीकडे तक्रारदार महिलेने काही व्यक्तींनी कुटुंबाशी संबंधित बाबींवर तिची खिल्ली उडविल्याचे सांगितले. तसेच घराच्या अंगणातील सुमारे ३०० लिटरची पाण्याची बॅरल मुद्दाम उलटवून नुकसान केल्याचा संशय आणि ग्रामस्थांच्या बैठकीची दवंडी देताना आपल्याला जाणीवपूर्वक वगळले जात असल्याची तक्रारही तिने मांडली.
या सर्व बाबी शांतपणे ऐकून घेतल्यानंतर PI मारुती आंधळे यांच्या कौशल्यपूर्ण समुपदेशनाची झलक या चर्चेत प्रकर्षाने दिसून आली. त्यांनी कोणत्याही एका बाजूचा पूर्वग्रह न ठेवता दोन्ही बाजूंना समजावून सांगत गैरसमजांचे मूळ समजून घेतले. विशेषतः अंधश्रद्धेबाबत त्यांनी ग्रामस्थांना वास्तववादी विचार करण्याचे आवाहन केले. एखादा खाद्यपदार्थ किंवा वस्तू विधीच्या नावाखाली कुणासाठी ठेवली म्हणून त्याचा त्या व्यक्तीवर अनिष्ट परिणाम होतो, अशा समजुतींना आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अशा गैरसमजांमध्ये अडकण्यापेक्षा कुटुंबाच्या कल्याणाकडे आणि मुलांच्या शिक्षण व भवितव्याकडे लक्ष द्या,” असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.
तसेच कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असा स्पष्ट इशारा देत वादासाठी न्यायालयाचा मार्ग उपलब्ध असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याचे PI आंधळे यांनी सांगितले. संवाद, संयम आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन करत त्यांनी तक्रारदार महिलेच्या ३०० लिटरच्या पाण्याच्या बॅरलच्या तक्रारीचीही सकारात्मक दखल घेत पोलिसांकडून नवीन बॅरल देण्यात येईल, असे सांगितले. संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात येऊन प्रकरणाचा पुढील भाग पूर्ण करण्याचेही ठरले.
या समुपदेशनानंतर चर्चेचे वातावरण पूर्णपणे बदलले आणि तणावाऐवजी सलोख्याची भावना निर्माण झाली. तक्रारदार महिलेच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे पोलिसांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. त्यानंतर झालेल्या छायाचित्रणावेळी तक्रारदार कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने संबंधित व्यक्तीच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवला. हातमिळवणीसदृश या मैत्रीपूर्ण प्रसंगातून परस्पर कटुता कमी होऊन वातावरण निवळल्याचे दिसून आले. सुरुवातीला तक्रारी, संशय आणि गैरसमजांनी व्यापलेल्या चर्चेला असा सकारात्मक व आपुलकीचा शेवट मिळणे हे विशेष ठरले.
रुद्रवलीच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात झालेल्या या चर्चेत PI मारुती आंधळे यांनी केवळ पोलिस अधिकारी म्हणून नव्हे, तर संयमी समुपदेशकाची भूमिकाही प्रभावीपणे बजावली. दोन्ही बाजू ऐकून घेणे, गैरसमज दूर करणे, अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करणे, कायदा हातात न घेण्याचा संदेश देणे आणि अखेरीस गावात सलोख्याचे वातावरण निर्माण करणे, या त्यांच्या कौशल्यपूर्ण हाताळणीचे उपस्थितांकडून कौतुक झाले. वाद वाढविण्यापेक्षा संवादातून तोडगा काढण्याची PI आंधळे यांची ही भूमिका पोलीस प्रशासनाच्या संवेदनशील आणि सकारात्मक कार्यपद्धतीचे उदाहरण ठरली.