खांडस–कळंब केंद्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत-ग्रामीण | मोतीराम पादीर
कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी श्री विद्या फाऊंडेशन व ग्रीनसोल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खांडस व कळंब केंद्रातील एकूण ६६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी कर्जत तालुका ठाकूर समाज संघटनेच्या महिला उपाध्यक्षा सौ. निलम वसंत ढोले व वसंत ढोले यांनी विशेष पुढाकार घेतला.
या उपक्रमात श्री विद्या फाऊंडेशनच्या प्रमुख श्रीमती गीता शेट्टी व ग्रीनसोल फाऊंडेशनचे श्री. चंद्रहास शेट्टी यांच्या माध्यमातून साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
खांडस केंद्रातील खांडस, बांगारवाडी, गावंडवाडी, अंभेरपाडा, चाफेवाडी, पादीरवाडी, पेटारवाडी, काठेवाडी व तुंगी या ९ शाळांतील ३५० विद्यार्थ्यांना दप्तर, बॅग, चप्पल व चटईचे वाटप करण्यात आले. तर कळंब केंद्रातील चाहुचीवाडी, बोरीचीवाडी, भागुचीवाडी, मिरचुलवाडी, सुतारपाडा, गरुडपाडा व माझी गिरेवाडीसह ८ शाळांतील ३१० विद्यार्थ्यांना चप्पल देण्यात आल्या.
श्री विद्या फाऊंडेशन ही संस्था महाराष्ट्रातील आदिवासी व गोरगरीब समाजासाठी सातत्याने कार्यरत असून, शिक्षणोपयोगी साहित्य वितरणासह महिला सक्षमीकरणासाठी टेलरिंग, नर्सिंग, पशुपालन, कुक्कुटपालन, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, बांबू हस्तकला तसेच रक्तदान शिबिरांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत झाली असून, पालक व ग्रामस्थांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.