माथेरानमधील ई-टॉयलेटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या सुविधेचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओतील प्रकारामुळे ‘हे ई-टॉयलेट आहे की एटीएम मशीन?’ असा उपरोधिक सवाल नागरिक आणि पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.
माथेरानमध्ये लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेटच्या वापर, कार्यक्षमतेसह देखभालीबाबत यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता समोर आलेल्या नव्या व्हिडिओमुळे या सुविधेची प्रत्यक्ष अवस्था आणि देखभाल व्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका महिला पर्यटकाने ई-टॉयलेट वापरताना आलेला अनुभव कथन केला आहे. ई-टॉयलेटमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यानंतरही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर नाणे मशीनमध्ये अडकल्याने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नाणे काढताना मशीनमधून पैसे बाहेर येत असल्याचे दिसून आल्याचा दावा संबंधित महिला पर्यटकाने व्हिडिओमध्ये केला आहे.
या प्रकारामुळे ई-टॉयलेटच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले हे ई-टॉयलेट नियमितपणे कार्यरत आहे का? त्याची देखभाल कोण करीत आहे? मशीनमध्ये नाणी अडकल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना केली जाते का? तसेच, लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या सुविधेचा नागरिक आणि पर्यटकांना अपेक्षित लाभ मिळत आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
नव्या व्हिडिओमुळे माथेरान नगरपालिकेच्या ई-टॉयलेट प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने या सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करून मशीनची तांत्रिक स्थिती तपासावी आणि व्हिडिओतील प्रकाराबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा जर प्रत्यक्षात नागरिकांच्या उपयोगाचीच ठरत नसेल, तर या खर्चाचा नेमका उपयोग काय? असा थेट सवाल माथेरानकर आणि पर्यटकांकडून केला जात आहे. ई-टॉयलेटची देखभाल, कार्यक्षमता आणि नागरिकांना मिळणारी सुविधा याबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.