‘आदर्श’ नावामुळे होणारा संभ्रम टाळण्यासाठी पतसंस्थेचा मोठा निर्णय; आता ‘सुरेश पाटील आदर्श’ या नावानं ओळख

‘आदर्श’ नावामुळे होणारा संभ्रम टाळण्यासाठी पतसंस्थेचा मोठा निर्णय
रायगड | अमुलकुमार जैन
राज्यातील ‘आदर्श’ नावाच्या विविध पतसंस्थांबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे सभासदांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याने अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे संस्थेचे नाव ‘सुरेश पाटील आदर्श अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’ असे राहणार आहे. नाव बदलाचा ठराव संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
चेंढरे येथील पी.एन.पी. नाट्यगृहात शनिवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी अभिजीत सुरेश पाटील होते. संचालक अ‍ॅड. आत्माराम काटकर यांनी नाव बदलाचा ठराव मांडला. सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात ठरावाचे स्वागत केले.अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले की, राज्यातील इतर ‘आदर्श’ नावाच्या संस्थांबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळा आपल्या संस्थेचे छायाचित्र किंवा माहिती वापरली जाते. त्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होतो. भविष्यात असा गैरसमज होऊ नये, यासाठी संस्थेच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सभेत सांगण्यात आले. संस्थेचे ५८ हजार ८८६ सभासद, ५९६ कोटी ८८ लाख रुपयांच्या ठेवी आणि ४६० कोटी ७३ लाख रुपयांचे कर्जवाटप आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय १,०५७ कोटी ६१ लाख रुपये, तर ढोबळ नफा १५ कोटी ४१ लाख रुपये झाला आहे. ठेवींमध्ये ३७ टक्के आणि कर्जवाटपात ४५ टक्के वाढ झाली आहे.
याशिवाय माणगाव आणि पुणे-वारजे शाखांसाठी जागा खरेदी करण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले. संस्थापक सुरेश पाटील यांनी यंदा १,५०० कोटी आणि पुढील दोन वर्षांत २,५०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करण्याचा मानस व्यक्त केला. सभेवेळी शहीद वीर सुयोग यांच्या पत्नी निशा कांबळे यांना ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच फायटर पायलट कौस्तुभ मेहुल पाटील आणि शास्त्रज्ञ प्रदीप ताम्हाणे यांचा सत्कार करण्यात आला.