तालुक्यातील देवळे येथील शेतकऱ्यांना एकदाच मोबदला देऊन चारवेळा शासनाचा निधी खर्ची टाकण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी देवळे धरण प्रकल्पाच्या कामाची राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रत्यक्ष धरणप्रकल्पाजवळ जाऊन पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याच्या तसेच गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. याचवेळी उन्हाळी पाणी टंचाई भेडसावणाऱ्या 15 गावांना दिलासा देण्यासाठीही मंत्री गोगावले यांनी स्पष्ट निर्देश दिले.
पोलादपूर तालुक्यातील देवळे धरण प्रकल्पाच्या परिसरातील देवळे, करंजे, नाणेघोळ, पितळवाडी, चाळीचा कोंड, वाकण, घागरकोंड अशा डोंगराळ भागातील गावांमध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा तीव्र तुटवडा भासत आहे. विशेषत: उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत असते. शेतीसाठी देखील पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे ‘धरण उशाशी आणि कोरड घशाशी’ अशी अवस्था अनुभवणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी ही बाब मंत्री गोगावले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी तातडीने आपल्या मोटारींचा ताफा देवळे धरण प्रकल्पाकडे वळवून संबंधित ठेकेदार मोरे आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि परिसरातील गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
ाावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. निलेश कुंभार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, तालुका प्रमुख निलेश आहिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, देवळे भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, अशी इच्छा असून देवळे धरण पूर्ण झाल्यानंतर या डोंगराळ भागातील पाणीटंचाई कमी होऊन शेतीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनमान उंचावण्याची अपेक्षा व्यक्त करून पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याचा विश्वास व्यक्त केला. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शेतकरी तसेच प्रशासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करीत जनतेला दिलासा देण्याची ग्वाही यावेळी मंत्री गोगावले यांनी दिली.
उन्हाळी पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देवळे धरण प्रकल्पाचा उपयोग होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. देवळे धरणामुळे नदीकाठी असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे बळकटीकरण होणार असून पाणी साठवण क्षमता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, संपूर्ण परिसरातील सुमारे 10 ते 15 गावांना याचा लाभ मिळणार आहे.