बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स संकुलातील एमएमआरडीए मैदानावर 2 ते 14 मे दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील एकूण 28 महिला बचतगटांनी सहभाग घेतला आहे. यामुळे रायगडच्या ग्रामीण भागातील महिलांना आपले उत्पादन विक्रीसाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना खुली बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स संकुलातील एमएमआरडीए मैदानावर महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाशी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची तुलना होऊ शकते, अशा प्रकारचे स्वरूप या प्रदर्शनाला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरच्या प्रदर्शनात रायगड जिल्हयातील 28 समुहांनी सहभाग घेतला असून जिल्हा महिला समन्वयक म्हणून निशा आवस्कर व जिल्हा समन्वयक सौरभ देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या 28 बचतगटांपैकी 24 बचतगटांनी आपल्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. तर 4 बचतगटांनी खाद्यपदार्थांचे स्टाॅल लावले आहेत. या बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थांना नागरिकांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या बचतगटांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. हे प्रदर्शन हे 14 मेपर्यंत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स संकुलातील एमएमआरडीए मैदानावर भरविण्यात आले असून सर्व ग्राहकांनी महालक्ष्मी सरस 2026 या विक्री प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले आहे.