कशेळे परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; नागरिकांत भीतीचं वातावरण

कर्जत ग्रामीण | मोतीराम पादीर
कर्जत तालुक्यातील कर्जत–मुरबाड महामार्गाजवळ कशेळे गावाच्या हद्दीत सीएनजी पंपाच्या पुढील वळणावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त महितीनुसार, कर्जत–मुरबाड महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना आज सकाळी मृतदेह दिसून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कशेळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार मृत व्यक्तीचे वय सुमारे ५० ते ६० वर्षांच्या दरम्यान असून मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविण्यात अडचणी येत असून कर्जत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, स्थानिकांच्या मते मृत व्यक्ती ही फिरस्ती किंवा भंगार गोळा करणारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताने मृत्यू झाला असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या प्रकरणाचा लवकर उलगडा करण्याची मागणी केली आहे.