पोलादपूरमध्ये ‘आकार प्रतिष्ठान’तर्फे मान्यवरांचा गौरव

पोलादपूर | प्रतिनिधी 
संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण मराठी साहित्य परिषदेची 1997 साली सोनपंखीकार कवी वसंत पालकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर तालुक्याची शाखा सुरू झाल्यानंतर जयंत देशपांडे व शैलेश पालकर यांनी कोमसाप पोलादपूरचे अध्यक्षपद भूषविले याबद्दल कापडे बुद्रुक येथे आकार प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार वितरण सोहळयाप्रसंगी त्यांच्यासह वरदायिनी माध्यमिक शाळा, माजी शिक्षकांसह अनेकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जुन्या आजीव सदस्यांना बाजूला ठेऊन नव्याने कोमसाप पोलादपूर शाखा सुरू करण्यासंदर्भात व्यासपिठावरून विचार व्यक्त झाले.
याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, राधा प्रकाशनचे प्रकाशक यादवेंद्र सपकार यांच्यासह उरणमधील उच्च माध्यमिक शाळेचे ल.बु.पाटील यांच्यासोबत इतिहासतज्ज्ञ सुखद राणे, आकार प्रतिष्ठान, पोलादपूरचे अध्यक्ष अजय सलागरे, उपाध्यक्ष रामदास सकपाळ व सचिव राजाराम शेलार सहसचिव ज्ञानेश्वर उतेकर, खजिनदार रविकांत सकपाळ, सहखजिनदार सुनील चव्हाण तसेच आकार प्रतिष्ठनचे विश्वस्त उपस्थित होते.
पोलादपूर गौरव पुरस्कार 2025-26 अंतर्गत विविध क्षेत्रांतील एकूण 11 मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आदर्श साहित्य सेवक भाषा गौरव पुरस्कार जयंत भा. देशपांडे पोलादपूर तालुका आदर्श पत्रकार शैलेश पालकर या कोमसाप पोलादपूरच्या माजी अध्यक्षांसह आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार (प्राथमिक विभाग) सुदर्शना मोरे, आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार (माध्यमिक विभाग) सुनील शिंदे, आदर्श शाळा – विशेष गुणवत्ता पुरस्कार (माध्यमिक विभाग) श्री वरदायनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कापडे बुद्रुक, आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार (प्राथमिक विभाग) रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा चांभारगणी बुद्रुक, आदर्श कीर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार अनंत महाराज चव्हाण, आदर्श शासकीय अधिकारी सेवा रत्न पुरस्कार मनीष योगी, आदर्श शेतकरी कृषीरत्न पुरस्कार भगवान अहिरे यांचा विविध मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी आदर्श व्यावसायिक उद्योगरत्न पुरस्कार निलेश कोळसकर व आदर्श समाजरत्न पुरस्कार कृष्णा कदम हे पुरस्कार स्विकारण्यास उपस्थित राहिले नाहीत.
याप्रसंगी उरणमधील उच्च माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक ल.बु.पाटील यांच्याहस्ते कापडे हायस्कूलचे  महाडस्थित माजी मुख्याध्यापक अजितकुमार जंगम यांच्या ‘आपलं कोकण’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करण्यात आला. याप्रसंगी पोलादपूर तालुक्यात कोकण मराठी साहित्य परिषदेची शाखा उघडण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कोमसापचे जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी मधुभाई कर्णिक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने पोलादपूर कोमसाप शाखा सुरू करण्यासंदर्भात विचार मांडला गेल्याने लवकरच ही शाखा सुरू झाल्याची गोड बातमी अजितकुमार जंगम आणि  त्यांचे सहकारी आपणास देतील, अशी अपेक्षा जाहिर केली.
यावेळी कापडे येथील वरदायिनी विद्यामंदिरच्या माजी शिक्षकांचा सत्कार आकार प्रतिष्ठानतर्फे करण्यात आला.