भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील एका युवकाने देशविरोधी आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी मोसिन मुजावर याला पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्टेशन येथून सोमवारी (१२ मे) पहाटे अटक केली आहे.
मोसिन मुजावरने ३ एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवरून “बॉम्ब, मिसाईल सब रेडी है… इंडिया भी हमारा होगा… दबा के मारेंगे” असे चिथावणीखोर वक्तव्य करत भारताविरोधात व द्वेषमूलक मजकूर पोस्ट केला होता. यामुळे पेण शहरात धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.
या पोस्टनंतर आयुष किरण शहा यांनी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष साईराज कदम यांच्या माध्यमातून ९ मे रोजी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोस्टची पडताळणी करून मोसिन मुजावरविरोधात भारतीय दंड संहिता कलम 353(1)(ख) व 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पेण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोसिनचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पेणमध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला तसेच नागरिकांनी अनेक प्रकारच्या घोषणा देत रोष व्यक्त केला.