रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कोळवट गावात सोमवारी सकाळी आरतीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात १३ लहान बालकांसह एकूण ४२ जण जखमी झाले आहेत. यातील काही ग्रामस्थांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
आज सकाळी नऊच्या सुमारास ग्रामदेवतेच्या मंदिरात आरती सुरू असताना मधमाश्यांनी उपस्थितांवर एकदम हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली. मधमाशांनी अनेक ग्रामस्थांना डंख मारल्याने काही गंभीर जखमी झाले.
जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालय तसेच माणगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व १०८ रुग्णवाहिका चालकांचे विशेष कौतुक केले आहे, कारण त्यांनी तातडीने मदत केली.
या प्रकारामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी व धार्मिक कार्यक्रमात झालेली शोकांतिका असल्याचे म्हटले आहे.
मागील घटना:
२० जून २०२४: पोलादपूर तालुक्यातील नीवे गावात वटपौर्णिमेनिमित्त पूजा करताना महिलांवर मधमाशांचा हल्ला.
२४ जून २०२४: वडघर गावातील अंत्यसंस्कारावेळी मधमाशांचा पुन्हा हल्ला, २५ जण जखमी.
१४ फेब्रुवारी २०२५: पनवेलच्या कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू.