नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (NMMT) बसमध्ये एका प्रेमी युगलाचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ महिनाभरापूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. या प्रकारामुळे एनएमएमटीच्या बससेवेवर टीका झाली होती. या प्रकरणात बसच्या वाहक जाधव यांना दोषी धरून प्रशासनाने तात्पुरते निलंबित केले होते.
विशेष बाब म्हणजे, याच वाहकाने केलेल्या तक्रारीवरून कामोठे पोलिसांनी संबंधित प्रेमी युगलाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी युगलाचा शोध घेत त्यांना नोटीस बजावली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयात दोघांनी आपली चूक मान्य केल्यानंतर त्यांना प्रत्येकी ₹2,000 चा दंड ठोठावण्यात आला व सोडण्यात आले.
ही घटना पनवेल रेल्वेस्थानकाजवळून निघालेल्या कल्याण मार्गावरील बसमध्ये घडली. तळोजा आयजीपीएल थांब्यापर्यंत ही बस प्रवास करत होती. कळंबोली सर्कलजवळ त्यांच्या कृतीचे चित्रीकरण करण्यात आले. चार दिवसांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चेचा विषय बनले.
प्रेमी युगलाला न्यायालयाकडून शिक्षा मिळाल्यानंतर, एनएमएमटी प्रशासनानेही निलंबित वाहक जाधव यांना पुन्हा कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.