उरण येथून नुकतीच सुरू झालेली उरण-नेरुळ हार्बर रेल्वे सेवा सुरुवातीलाच अडथळ्यांमध्ये अडकली असल्याचे स्पष्ट दिसून येते. उरण रेल्वे स्टेशनवरील मूलभूत सुविधांची कमतरता प्रवाशांच्या त्रासात भर घालत आहे.
स्टेशनवरील दोन लिफ्ट्स अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. पूर्वेकडील तिकीट बुकिंग ऑफिसजवळचे टॉयलेट सुरु असले तरी पश्चिमेकडील टॉयलेट अजूनही बंद आहे. विशेषतः महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी फीडिंग रूमची गैरसोय जाणवते.
स्टेशनची साफसफाई दुपारी व संध्याकाळी केवळ ४ ते ५ कामगारांद्वारे केली जाते, त्यामुळे दिवसभर धुळीचा सामना करावा लागतो. स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असून सुरक्षारक्षक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रवाशांना स्टेशनवर कँटीनची सुविधा नाही, तर रिक्षा व्यवस्था देखील अपुरी आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत लांबच लांब रांगा लागतात. याशिवाय, रेल्वेने प्रत्येक स्थानकावर ५ ते ६ सेकंद थांबण्याचा नियम असताना, उरण स्थानकावर ३ ते ४ मिनिटांचा थांबा घेतला जातो. परिणामी प्रत्येक गाडी १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे.
या सर्व प्रकारामुळे उरण येथील प्रवासी नागरिक संतप्त असून लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास आंदोलनाची तयारी करत असल्याचे समजते.