गर्द वनराई अशीच ओळख असणाऱ्या माथेरान मध्ये काही वर्षांपासून बंगल्याची विक्री होत गेल्याने बंगल्याच्या आवारातील असंख्य झाडांची कत्तल झाली असून आजही केली जात आहे.माथेरान मधील थंड हवेचा गारवा पुढील काळात संपुष्टात आल्यास इकडे कुणीही फिरकणार नाही याचा संपूर्ण पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एकूण २५६ बंगले प्लॉट्स होते त्यातील काही बंगले मालकांनी दलालांच्या मार्फत आपल्या बंगल्याची विक्री केली असून या जुन्या हेरिटेज बंगल्याचे रूपांतर अल्पावधीतच शानदार हॉटेलमध्ये परिवर्तित केले जात आहे. त्यामुळे हॉटेल बांधकामे करताना अडसर ठरणारी जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची झाडी इलेक्ट्रीक कटरच्या साहाय्याने गपचुप कापली जात आहे. रस्त्यावरून न दिसणारे गर्द झाडीतील बंगले आता पूर्णपणे दृष्टिस पडत आहेत त्यामुळे त्या त्या भागातील जंगल भाग पूर्णपणे उजाड झालेला दिसत आहे.
दलाल मंडळी स्वतःच्या व्यवसायासाठी,स्वार्थासाठी मुंबईतील धनिकाना इथल्या जुन्या हेरिटेज बंगल्याची विक्री करत आहेत परंतु इथली वनराई शाबूत राहण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. काही हॉटेल मालक सुध्दा मोठमोठ्या इंडस्ट्री मालकांच्या आदेशानुसार जुने बंगले विकत घेत असल्याचे बोलले जात आहे. मागील काळात रिलायन्स समूहाने काही हॉटेल्स खरेदी करून ते स्वतःच्या कर्मचारी,अधिकारी वर्गासाठी वापरात आहेत त्यामुळे त्या त्या हॉटेलमध्ये नेहमी येणारे जुने खर्चिक पर्यटक आपसूकच कमी झाले आहेत.याचाही परिणाम इथल्या लहानमोठ्या व्यावसायिकांवर झालेला दिसत आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे बहुतांश विक्री झालेल्या बंगल्यातील जुनी झाडे मुळासहित छाटली गेली आहेत त्यामुळे इथल्या निसर्गरम्य वातावरणात उष्मा जाणवत आहे. याबाबत काही माहिती उजेडात येऊ नये यासाठी नव्याने खरेदी केलेल्या बंगल्याच्या गेटवर वाचमेन तैनात करण्यात आल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे माथेरानची ओळख असणारी बंगल्याच्या आवारातील ही वनराई वाचविण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.