Mumbai-Goa Highway: कंत्राटदाराची ‘नामी शक्कल’; नागोठणे येथील धोकादायक उड्डाणपुलाला काचपट्ट्यांचा आधार!

नागोठणे येथील धोकादायक उड्डाणपुलाला पट्ट्यांचा आधार!
नागोठणे | महेंद्र माने 
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे येथील उड्डाणपुलाला पडलेल्या भेगांवर मजबूत डागडुजी करण्याऐवजी कंत्राटदाराने चक्क एमसील लावून त्यावर काचपट्ट्या लावल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत संरक्षक भिंतीला तडे गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या या पुलाच्या डागडुजीच्या पद्धतीवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘काचपट्टी की थुकपट्टी?’ असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नागोठणे विभागप्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ रखडले आहे. सरकारकडून पनवेल ते पोलादपूरदरम्यानचे काम बहुतांशी पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी नागोठणे, कोलेटी, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव परिसरातील अनेक लहान-मोठ्या पुलांची कामे अद्याप चर्चेत आहेत. नव्याने तयार केलेल्या काँक्रीट रस्त्यांना तडे जाणे आणि बांधकामाच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होणे, यामुळे महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यातच नागोठणे येथील मुरावाडी ते इंद्रप्रस्थ हॉटेलदरम्यानच्या उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. सिमेंटच्या ब्लॉकला भेगा पडल्याने पावसाचे पाणी आत झिरपून संरक्षक भिंत कमकुवत होण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली.
मात्र, धोकादायक स्थितीतील पुलाची शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करण्याऐवजी भेगा पडलेल्या सिमेंट ब्लॉकच्या मधोमध एमसील लावून त्यावर काचपट्ट्या लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी तडे गेलेल्या भागात खुंट्याही ठोकण्यात आल्याचे दिसून येत असल्याने ही दुरुस्ती नेमकी कशासाठी आणि कोणत्या तांत्रिक निकषांनुसार करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
हा संपूर्ण उड्डाणपूल मातीच्या भरावावर असून त्याची उंची सुमारे २५ फुटांपर्यंत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुलालगतच्या सर्व्हिस रोडवर वाहतुकीची मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संरक्षक भिंत ढासळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने तांत्रिक तपासणी करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. “पुलाच्या भेगांवर काचपट्टी लावून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यापेक्षा पुलाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. उद्या दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल प्रकाश मेस्त्री यांनी उपस्थित केला.
कंत्राटदाराची ‘नामी शक्कल’ चर्चेत
पुलावरील तडे नेमके किती धोकादायक आहेत, हे तपासण्यासाठीच काचपट्ट्या लावण्यात आल्या असल्याची चर्चा आहे. काचपट्टीला तडा गेल्यास पुलाच्या हालचाली किंवा भेगांची स्थिती लक्षात येईल, असा तर्क यामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सार्वजनिक बांधकामाच्या कामात अशी ‘जुगाड’ पद्धत वापरली जात असेल, तर बांधकामाच्या दर्जाची आणि सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागोठणे उड्डाणपुलाच्या या प्रकारामुळे ‘महामार्गाचे काम दर्जेदार की केवळ दिखाऊ?’ यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी व कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.